अग्रलेख । अपप्रचाराचे बळी

रेजिनाल्ड यांना ज्या गोष्टी देण्याचे आश्वासन दिले होते त्या कदाचित त्यांना दिल्या गेल्या नाहीत. गोवा अत्यंत लहान आहे, त्यामुळे इथे एखाद्याने मनातली गोष्ट सुद्धा उघड केली नाही, तरीही ती बाहेर पडते.

Story: अग्रलेख |
18th January 2022, 01:03 am
अग्रलेख । अपप्रचाराचे बळी

माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी शेवटी तृणमूल काँग्रेसमधून माघार घेतली. प्रशांत किशोर यांनी केलेले ब्रेनवॉश गोव्यातील राजकीय नेत्यांच्या पचनी पडत नसावे किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी गोव्यातील सक्रिय झालेली पडद्यामागून काम करणारी राजकीय आणि धार्मिक शक्ती यशस्वी होत असावी. आलेक्स रेजिनाल्ड हे गेली दहा वर्षे विरोधात राहिले, पण गोव्यातील अनेक सामाजिक विषयांमध्ये आणि उपक्रमांमध्ये ते कायम सक्रिय राहिले म्हणून सत्ताधारी असो किंवा विरोधक सर्वांमध्ये रेजिनाल्डने स्वतःचे असे स्थान तयार केले आहे. त्यामुळेच रेजिनाल्डने काँग्रेसपासून फारकत घेतली तेव्हा अनेकांना धक्का बसला. पण हेच रेजिनाल्ड गेल्या एक दोन वर्षांपासून काँग्रेसपासून दूर होते. काँग्रेसच्या कार्यालयातही ते जात नव्हते. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी त्यांचे कधी जुळले नाही. विरोधी पक्षनेतेपद त्यांच्या वाट्याला यायला हवे होते, पण काँग्रेसने त्या पदाबाबतही पक्षपातीपणा केला. विरोधी आमदारांमध्ये सर्वांत जास्त चांगले काम असूनही रेजिनाल्डच्या पदरी निराशाच आली़. पण त्यांच्या आग्रही आणि आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी गटात त्यांचा धाक होता, म्हणून कुडतरी मतदारसंघातील विकास कामांमध्ये फारसा अडथळा आल्याचे ऐकिवात नाही. पण दहा वर्षे विरोधात राहिल्यामुळे एखाद्या आमदाराची जी स्थिती होते, तशीच रेजिनाल्ड यांची झाली. काँग्रेस सोडून कुठे जावे या विवंचनेत असताना काँग्रेसशी फारकत घेणाऱ्यांसाठी तृणमूल काँग्रेसने आपली दारे उघडली. लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आलेक्स रेजिनाल्ड यांनीही तृणमूलची वाट धरली. भाजप, काँग्रेसकडून तृणमूलविषयी जो आतून अपप्रचार सुरू आहे, त्याचा परिणाम म्हणून तृणमूलमध्ये जाण्यासाठी अनेकजण कचरत आहेत. ज्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्यावरही दुसऱ्या पक्षासोबत जाण्यासाठी दबाव वाढत आहे. तृणमूलशी युती केलेल्या मगो पक्षाने तृणमूलची साथ सोडावी अशा प्रकारचे सोशल मीडियावर अनेक पोस्ट भाजपधार्जिण्या लोकांकडून केले जात आहेत. अर्थात भाजप आणि मगोने शेवटच्या क्षणी हातमिळवणी करावी असा या अपप्रचाराचा एक हेतू आहे. तसेच तृणमूलला गोव्यात तग धरू द्यायची नाही असा दुसरा हेतू आहे. एकूणच कुठेही जा पण तृणमूलमध्ये नको अशा प्रकारचा दबाव राजकीय नेत्यांवर आणला जात आहे. या दबाव आणण्यामागेही काही राजकीय व धार्मिक शक्तींचा हात असल्याचे नाकारता येणार नाही. आलेक्स रेजिनाल्ड यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दिवसांपासून ते पराभूत होतील, अशा प्रकारचे पिल्लू सोडले गेले. काँग्रेसमध्ये असते तर कदाचित जिंकले असते, पण तृणमूलमध्ये गेल्यामुळे पराभव पहावा लागेल अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. दहा वर्षे विरोधात, होते, जेव्हा सत्तेत होते तेव्हा मंत्रिमंडळात नव्हते. त्यामुळे सलग पंधरा वर्षे कुडतरीतून जिंकून येऊनही मंत्रिपद न मिळाल्यामुळे तिथले मतदारही दुसरा पर्याय शोधतात. अर्थात प्रस्थापितांविरोधात असलेला हा असंतोष आहे. त्यावरही मात करण्याची ताकद रेजिनाल्ड यांच्यात आहे, पण ते अपप्रचाराला लवकर बळी पडतात म्हणूनच काँग्रेस सोडण्याचा त्यांचा निर्णयही त्यांनी असाच रागाच्या भरात घेतला होता. तृणमूलमध्ये जाण्यापूर्वी ते आम आदमी पक्षाच्या संपर्कात होते. त्यांनी त्यावेळी दिल्लीवारीही केली होती. सगळी बोलणी झाली. ज्या दिवशी आपमध्ये जाणार होते, त्याच दिवशी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली. राहुल गांधी यांचाही फोन आला. त्यामुळे त्यावेळी रेजिनाल्ड यांनी आपमध्ये जाण्याचे टाळले. पण प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याशी भेट घेऊन त्यांनी रीतसर तृणमूलमध्ये प्रवेश केला. रेजिनाल्ड यांना ज्या गोष्टी देण्याचे आश्वासन दिले होते त्या कदाचित त्यांना दिल्या गेल्या नाहीत. गोवा अत्यंत लहान आहे त्यामुळे इथे एखाद्याने मनातली गोष्ट सुद्धा उघड केली नाही, तरीही ती बाहेर पडते, गोव्याच्या शेवटच्या टोकापर्यंतही पोहचते. रेजिनाल्ड यांनी भाजपात प्रवेश केला असता तर त्यांना कुडतरीत विरोध झाला असता. पण तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे टोकाचा विरोध होतो हे फारसे पटण्यासारखे नाही. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून रेजिनाल्डने पुन्हा काँग्रेसमध्ये यावे किंवा गोवा फॉरवर्डमध्ये जावे यासाठी प्रयत्न सुरू होते. या दरम्यान चर्चेच्या अनेक वाटाघाटी झाल्याची शक्यता आहे, त्यामुळेच रेजिनाल्ड यांनी तृणमूल सोडून काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरू केली असावी.