पैसे सुटे करायला गेला अन् चित्रकार बनला कोट्यधीश!


18th January 2022, 11:50 pm
पैसे सुटे करायला गेला अन् चित्रकार बनला कोट्यधीश!

कोची : केरळमधील ६८ वर्षीय चित्रकाराचे नशीब काही मिनिटांतच चमकले आणि ते करोडपती झाले. वास्तविक, केरळमधील रहिवासी असलेल्या सदानंदनने पैसे सुट्टे करण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्याला १२ कोटींचा जॅकपॉट लागला. करोनाच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या सदानंदनसाठी १२ कोटींची लॉटरी लागली यावर विश्वास ठेवणे कठीण होते.

केरळमधील आयमनममधील कुदयमपाडी येथे राहणारे चित्रकार सदानंदन यांनी रविवारी सकाळी ३०० रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. सामान खरेदीसाठी ते पहाटे घरून निघाले होते आणि पैसे सुटे नसल्याने त्यांनी लॉटरीचे तिकीट काढले. लॉटरीच्या सोडतीच्या काही तास आधी त्यांनी हे तिकीट खरेदी केले आणि काही तासांतच सदानंदन करोडपती झाले. सदानंदन सांगतात की, ते पेंटिंगचे काम करतात आणि महामारीनंतर त्यांचे आयुष्य संघर्षातून जात होते. ते म्हणाले, मला स्वतःचे एक चांगले घर बनवायचे आहे आणि माझ्या मुलांचे भविष्य घडवायचे आहे.

सदानंदनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सेलवन या स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीची तिकिटे खरेदी करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांच्या ५०० च्या नोटा सुट्या करता येतील. त्यांनी सांगितले की, 'मी जवळच्याच मीट स्टॉलवर जात होतो आणि सुट्टे शोधत होतो. दुपारपर्यंत निकाल जाहीर झाल्याने मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता.