केंद्र सरकारकडून करोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे


18th January 2022, 11:54 pm
केंद्र सरकारकडून करोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली : देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या करोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करून सरकारने डॉक्टरांना कोविड रूग्णांच्या उपचारात स्टेरॉईड्सचा वापर कोणत्याही स्थितीत टाळण्यास सांगितले आहे.
ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एआयआयएमएस), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कोविड-१९ नॅशनल टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत जॉइंट मॉनिटरिंग ग्रुप (डीजीएचएस) यांनी जारी केले आहे.
सुधारित नवीन मार्गदर्शक तत्त्वे
१) नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, असे म्हटले आहे की, जर कोविडची लक्षणे रुग्णाच्या वरच्या श्वसनमार्गामध्ये उद्भवली आणि रुग्णाला श्वासोच्छवास किंवा हायपोक्सियासारख्या समस्या नसल्यास, त्याला सौम्य लक्षणांमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्याच्यावर घरीच उपचार करावेत. विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना पाच दिवसांपेक्षा जास्त काळ श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा जास्त ताप किंवा तीव्र खोकला असल्यास डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.
२) जर एखाद्याला सतत खोकला येत असेल किंवा दोन-तीन आठवडे बरा होत नसेल, तर त्याने क्षयरोग (टीबी) किंवा तत्सम इतर कोणत्याही आजाराची तपासणी करून घ्यावी.
३) जर रुग्णाच्या ऑक्सिजनचे प्रमाण ९० ते ९३ टक्क्यांच्या दरम्यान चढ-उतार होत असेल आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे. ही मध्यम लक्षणे असून अशा रुग्णांना ऑक्सिजनचा आधार दिला पाहिजे.
४) जर एखाद्या रुग्णाचा श्वासोच्छवास दर मिनिटाला ३० पेक्षा जास्त असेल. श्वास घेण्यात अडचण येत असेल आणि खोलीच्या तापमानाच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन संपृक्तता असेल तर ते गंभीर लक्षण मानले जाईल आणि रुग्णाला श्वास घेता येत नसल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे व ऑक्सिजन सपोर्ट द्यावा.
५) नॉन-इनवेसिव्ह व्हेंटिलेशन (एनआयव्ही) हेल्मेट आणि फेस मास्क इंटरफेस अशा रूग्णांसाठी फिट केले जातील ज्यांना जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असेल आणि ज्यांना मंद श्वासोच्छ्वास असेल.
६) सौम्य ते गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये इमर्जन्सी किंवा 'ऑफ लेबल' रेमिडिसिव्हर वापरण्याची परवानगी आहे. हे फक्त अशा रुग्णांवर वापरले जाऊ शकते ज्यांना कोणतीही लक्षणे दिसल्याच्या १० दिवसांच्या आत 'रेनल' किंवा 'यकृत बिघडण्याची' तक्रार नाही.
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांवर स्टेरॉयड्सचा वापर करण्यात आला होता. याच्या हेवी डोसमुळे अनेक रुग्णांना काळ्या बुरशीची लागण झाली आणि अनेकांना जीवही गमवावा लागला. रुग्णांना हाय शुगर लेव्हल आणि हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागले. काही प्रकरणांमध्ये, रुग्ण हाडांमध्ये तीव्र वेदना, चालणे, बसणे आणि झोपण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील करत होते.
स्टिरॉइड्सचा ओव्हरडोजला नकार का?
या सुधारित नवीन मार्गदर्शक तत्त्वात असे नमूद केले आहे की, स्टिरॉइड्स असलेली औषधे जर ते आधी किंवा जास्त डोसमध्ये किंवा जास्त काळ वापरल्यास म्युकोर्मायकोसिस किंवा ब्लॅक फंगस सारख्या दुय्यम संसर्गाचा धोका वाढवू शकतात
ज्येष्ठ नागरिकांना जास्त धोका
जे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी रोग, मधुमेह किंवा एचआयव्ही, क्षयरोग, तीव्र फुफ्फुस, मूत्रपिंड किंवा यकृत रोग, सेरेब्रोव्हस्कुलर रोग आणि गंभीर लठ्ठपणा यांसारख्या स्थिती असलेल्यांमध्ये आजारी पडण्याचा किंवा मरण्याचा उच्च धोका आहे.
करोनाबाधितांमध्ये काही प्रमाणात घट
देशात करोनाचा अनियंत्रित वेग कायम आहे. तथापि, आता त्याच्या नवीन व्हेरिएंटमध्ये काही प्रमाणात घट दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३८ हजार १८ नवीन रुग्ण आढळले असून ३१० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या काळात १ लाख ५७ हजार ४२१ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आज एकूण २० हजार ७१ कोॡ्ंरोनाचे रुग्ण कमी आले आहेत. सोमवारी करोनाचे २ लाख ५८ हजार ८९ नवे रुग्ण आढळले होते.