यंदा प्रजासत्ताक दिन परेड अर्धा तास उशिराने


18th January 2022, 11:55 pm
यंदा प्रजासत्ताक दिन परेड अर्धा तास उशिराने

नवी दिल्ली : भारत २६ जानेवारीला आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. देशात दरवर्षी या दिवशी राजपथावर प्रजासत्ताक दिन परेड आयोजित केली जाते. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनाची परेड नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे.
७५ वर्षात प्रथमच प्रजासत्ताक दिनाची परेड उशिराने सुरू होणार आहे. करोना प्रोटोकॉल आणि श्रद्धांजली सभेमुळे यंदा प्रजासत्ताक दिन परेड सुरू होण्यास उशीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा जवानांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात येईल, त्यानंतर परेड सुरू होईल.
परेड एकूण ९० मिनिटे चालते. दरवर्षी २६ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता राजपथ येथे प्रारंभ होतो. मात्र यावेळी परेड साडेदहा वाजता सुरू होईल. ही परेड ८ किलोमीटरची असेल. परेड रायसीना हिलपासून सुरू होते आणि राजपथ, इंडिया गेट मार्गे लाल किल्ल्यावर संपते. परेड सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.
३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
राजधानीत प्रजासत्ताक दिनापूर्वी, दिल्ली पोलिसांनी राजपथ आणि आसपासची सुरक्षा वाढवली आहे. सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून चेहऱ्याची ओळख पटवणारी यंत्रणाही बसविण्यात आली आहे. या यंत्रणेत ५० हजार संशयित गुन्हेगारांचा डाटाबेस आहे. कोविड-१९ संबंधित निर्बंधांमुळे केवळ ४ हजार तिकिटे उपलब्ध असतील आणि केवळ २४ हजार लोकांनाच या सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

हेही वाचा