भगवंत मान ‘आप’चे पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा


18th January 2022, 11:55 pm
भगवंत मान ‘आप’चे पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. सार्वजनिक मतदानाने हा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की सार्वजनिक मतदानात पंजाबमधील २१ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले होते, त्यापैकी ९३.३ टक्के लोकांनी भगवंत मान यांचे नाव घेतले.
पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी इतर पक्षांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, इतर पक्ष त्यांचा मुलगा, सून किंवा घरातील पुरुषाला मुख्यमंत्री चेहरा बनवायचे पण 'आप'ने तसे केले नाही. भगवंत मान हे माझे धाकटे भाऊ असल्याचे केजरीवाल म्हणाले. मी थेट त्यांचे नाव दिले असते तर घराणेशाहीचे आरोप झाले असते. केजरीवालांनी भावाला उमेदवारी दिली असे लोक म्हणतील. त्यामुळे सार्वजनिक मतदानाने हा निर्णय घेण्यात आला.
'आप'च्या सर्वेक्षणात सिद्धूचेही नाव
केजरीवाल यांनी सांगितले की, सार्वजनिक मतदानात २१ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केले. यामध्ये भगवंत मान यांच्या बाजूने ९३.३ टक्के मते पडली. दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. सिद्धू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. केजरीवाल यांच्या मते, सिद्धू यांनाही आपच्या सर्वेक्षणात ३.६ टक्के मते मिळाली आहेत. केजरीवाल म्हणाले की, मलाही मुख्यमंत्री बनवण्यासाठी अनेकांनी मतदान केले, पण मी पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होणार नाही, असे आधीच सांगितले होते.