पर्रात बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

दलालास अटक; दोन महिलांची सुटका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th January 2022, 10:22 pm
पर्रात बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने बनावट ग्राहक पाठवून ‘पर्रा टॉवर’ इमारतीजवळ चाललेल्या वेश्या व्यवसायाचा मंगळवारी सायंकाळी पर्दाफाश केला. याप्रकरणी मूळ उत्तरप्रदेश येथील विमलेश कुमार (रा. आगरवाडा-पेडणे) याला अटक करण्यात आली आहे. तसेच पर्रा आणि मांद्रे येथून आणलेल्या दोन महिलांचीही सुटका केली आहे. संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पर्रा परिसरात एक दलाल वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना आणि उपअधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. यामध्ये मंगेश वळवईकर, महिला साहाय्यक उपनिरीक्षक शीतल नाईक, विजयकुमार साळगावकर यांच्यासह बिगरसरकारी संस्थेच्या महिला सदस्यांचा समावेश होता.
मंगळवार, १८ रोजी सायंकाळी ४.४०ते ५.५५दरम्यान ‘पर्रा टाॅवर’ इमारतीजवळ या पथकाने सापळा रचला. पथकाने बनावट ग्राहकाला दलालाकडे पाठवले. त्या ग्राहकाने दलालाशी संपर्क साधून महिलेची मागणी केली. त्यानुसार, संशयित विमलेश ठाणे-महाराष्ट्र येथील एका २४ वर्षीय महिलेला घेऊन घटनास्थळी आला. लगेच गुन्हा शाखेने छापा टाकून संशयिताला त्या महिलेसह ताब्यात घेतले. त्यानंतर संशयिताने आणखीन एका महिलेला मांद्रे येथे ठेवल्याची माहिती समोर आली. पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून पश्चिम बंगाल येथील ३५ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. या दोन्ही महिलांची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, संशयित विमलेश कुमार याच्याविरोधात वेश्याव्यवसाय प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७० आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याचे कलम ४, ५ व ७, आरडब्ल्यू ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला रीतसर अटक केली. त्याला पोलीस कोठडीसाठी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल परब पुढील तपास करीत आहेत.