दीपक, इजिदोरना वगळले; मोन्सेरात, राणे दाम्पत्यांना उमेदवारी

पणजीत बाबूशवरच विश्वास; भाजपकडून ३४ उमेदवार जाहीर, पार्सेकरांची पुन्हा निराशा


20th January 2022, 01:33 pm
दीपक, इजिदोरना वगळले; मोन्सेरात, राणे दाम्पत्यांना उमेदवारी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीतील ३४ उमेदवारांची नावे गुरुवारी दिल्लीतून जाहीर केली. पक्षाने पणजीत माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना डावलून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. बाबूश आणि विश्वजीत पती-पत्नींना उमेदवारी दिली आहे. तर, विद्यमान आमदार तथा मंत्री दीपक प्रभु पाऊस्कर आणि उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना वगळून त्यांच्याजागी निष्ठावंतांना संधी दिली आहे.
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांनी गुरुवारी दुपारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ३४ उमेदवारांची नावे घोषित केली. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. भाजपने गुरुवारी जाहीर केलेल्या ३४ पैकी २० मतदारसंघांत विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. सावर्डे आणि काणकोणात मात्र विद्यमान आमदार दीपक पाऊस्कर आणि इजिदोर फर्नांडिस यांना वगळून त्यांच्याजागी गणेश गावकर व रमेश तवडकर या मूळ भाजप नेत्यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या विधानसभेत अपक्ष आमदार असलेल्या आणि काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या गोविंद गावडे, रोहन खंवटे यांच्यासह गोवा फॉरवर्डमधून आलेल्या जयेश साळगावकर, काँग्रेसमधून आलेल्या रवी नाईक यांना त्यांच्याच मतदारसंघांत उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना पेडण्यातून मडगावात पाठवण्यात आले आहे. तर मगोतून आलेल्या सुदेश भिंगी यांना मडकईतून उमेदवारी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री पार्सेकरांची पुन्हा ​निराशा
भाजपने माजी मुख्यमंत्री तथा मांद्रेचे माजी आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांची निराशा केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर लढून पार्सेकरांचा पराभव केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देत भाजपतर्फे पोटनिवडणूक लढवून आमदार झालेल्या दयानंद सोपटे यांनाच यावेळीही पक्षाने मांद्रेत उमेदवारी दिली आहे.
उत्पल पर्रीकरांना डिचोलीचा प्रस्ताव
पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने उत्पल पर्रीकर यांना पक्षाने डिचोलीतून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. यासंदर्भातील निर्णय पुढील दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे.
भाजपने जाहीर केलेले उमेदवार
१) साखळी : डॉ. प्रमोद सावंत
२) मांद्रे : दयानंद सोपटे
३) पेडणे : प्रवीण आर्लेकर
४) थिवी : नीळकंठ हळर्णकर
५) म्हापसा : जोशुआ डिसोझा
६) शिवोली : दयानंद मांद्रेकर
७) साळगाव : जयेश साळगावकर
८) पर्वरी : रोहन खंवटे
९) हळदोणा : ग्लेन टिकलो
१०) पणजी : बाबूश मोन्सेरात
११) ताळगाव : जेनिफर मोन्सेरात
१२) सांतआंद्रे : फ्रान्सिस सिल्वेरा
१३) मये : प्रेमेंद्र शेट
१४) पर्ये : दिव्या राणे
१५) वाळपई : विश्वजीत राणे
१६) प्रियोळ : गोविंद गावडे
१७) फोंडा : रवी नाईक
१८) शिरोडा : सुभाष शिरोडकर
१९) मडकई : सुदेश भिंगी
२०) मुरगाव : मिलिंद नाईक
२१) वास्को : कृष्णा (दाजी) साळकर
२२) दाबोळी : मॉविन गुदिन्हो
२३) नुवे : दत्ता बोरकर
२४) फातोर्डा : दामू नाईक
२५) मडगाव : मनोहर (बाबू) आजगावकर
२६) बाणावली : दामोदर बांदोडकर
२७) नावेली : उल्हास तुयेकर
२८) कुंकळ्ळी : क्लाफासियो डायस
२९) वेळ्ळी : सावियो रॉड्रिगीस
३०) केपे : चंद्रकांत (बाबू) कवळेकर
३१) कुडचडे : नीलेश काब्राल
३२) सावर्डे : गणेश गावकर
३३) सांगे : सुभाष फळदेसाई
३४) काणकोण : रमेश तवडकर
या मतदारसंघांतील उमेदवार घोषणा शिल्लक
१) डिचोली
२) सांताक्रूज
३) कुंभारजुवे
४) कुठ्ठाळी
५) कळंगुट
६) कुडतरी

हेही वाचा