पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल


20th January 2022, 09:32 pm
पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

लखनऊ : ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लॅमवर सरळ गेममध्ये विजय मिळवत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी एच. एस. प्रणॉयनेही पुरुष विभागात आपला सामना जिंकून आगेकूच केली.
अव्वल मानांकित पीव्ही सिंधूने दुसऱ्या फेरीचा सामना अवघ्या ३३ मिनिटांत २१-१६, २१-१३ असा जिंकला. तिचा पुढील सामना सहाव्या मानांकित थायलंडच्या सुपानिडा केथॉंगशी होणार आहे. दोघेही गेल्या आठवड्यात इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. यामध्ये सुपनिडा विजयी झाली होती. सिंधूने पहिल्या फेरीच्या सामन्यात देशबांधव तान्या हेमंतचा २१-९, २१-९ असा पराभव केला होता.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारताच्या सामिया इमाद फारुकीने देशबांधव कनिका कंवलचा २१-६, २१-१५ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिचा पुढील सामना अनुपमा उपाध्यायशी होईल. तिने स्मित तोष्णीवालचा २१-१२, २१-१९ असा पराभव केला. इंडिया ओपनमध्ये सायना नेहवालला हरवून धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मालविका बनसोडनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने प्रेरणा नेल्लुरीचा २१-१०, २१-८ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना अकार्षी कश्यपशी होईल, ज्याने आपल्या सामन्यात साई उज्जिता रावचा २१-९, २१-६ असा पराभव केला.
अटीतटीच्या सामन्यात प्रणॉयची बाजी
पुरुष विभागात, एच. एस. प्रणॉयने सुमारे ६५ मिनिटे चाललेल्या सामन्यानंतर विजय मिळवला. त्याने प्रियांशू राजावतचा २१-११, १६-२१, २१-१८ असा तीन गेमच्या संघर्षात पराभव केला. हरण्यापूर्वी १९ वर्षीय प्रियांशूने कडवी झुंज दिली मात्र प्रणॉयने अनुभवाचा उपयोग करून सामना जिंकला. प्रियांशुची गणना भारतातील उदयोन्मुख प्रतिभावंतांमध्ये केली जाते. भविष्याबद्दल त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या जात आहेत. भारताच्या चिराग सेनला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला रशियाच्या सर्गेई सिरांतने १८-२१, २२-२०, २१-१२ ने पराभूत केले. गुलशन कुमार कार्तिकेयाचा रशियाच्या अरनॉड मर्केलकडून २१-८, २१-११ असा पराभव झाला.