दुपारी यादी; सायंकाळी बंड!

भाजपकडून ३४ उमेदवार जाहीर; चार जागांवर अपक्षांचा मार्ग सुकर


20th January 2022, 11:44 pm
दुपारी यादी; सायंकाळी बंड!

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : संपूर्ण गोवा आतुरतेने वाट पाहत होता, ती भाजप उमेदवारांची यादी गुरुवारी दुपारी दिल्लीतून जाहीर झाली. राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांनी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत नाव न आल्याने दोन आमदार आणि काही इच्छुकांनी सायंकाळी बंडाचे झेंडे फडकावले. यातील काहींनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणाही केली.

यादीनुसार भाजपने पणजीत उत्पल पर्रीकर यांना डावलून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. घराणेशाहीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत बाबूश आणि विश्वजीत पती-पत्नींना उमेदवारी दिली आहे. विद्यमान मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर आणि उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना वगळून अनुक्रमे गणेश गावकर व रमेश तवडकर यांना संधी दिली आहे.

काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले गोविंद गावडे, रोहन खंवटे, जयेश साळगावकर, रवी नाईक यांना त्यांच्याच मतदारसंघांत उमेदवारी दिली आहे. बाबू आजगावकर यांना पेडण्यातून मडगावात पाठवले, तर मगोतून आलेले सुदेश भिंगी यांना मडकईतून उमेदवारी दिली आहे.

प्रतापसिंग राणेंशी चर्चा करूनच दिव्यांना उमेदवारी

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांनी यावेळी पर्येतून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी किंवा त्यांनी माघार घेऊन मतदारसंघ कुटुंबातील व्यक्तीसाठी सोडावा, अशी विनंती भाजपने त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रतापसिंग राणे यांनी आपला मतदारसंघ दिव्या राणे यांना देण्याची तयारी दर्शवली, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांच्याशी आपली याबाबत कोणतीही चर्चा झालेली नव्हती. ते विनाकारण आपल्या नावाचा वापर करत आहेत असे म्हणत, प्रतापसिंग राणे यांनी फडणवीस यांना उघडे पाडले.

पाच जण बंडाच्या पवित्र्यात

लक्ष्मीकांत पार्सेकर 

मांद्रेतून उमेदवारी नाकारलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपच्या जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांत निर्णयाची हमी कार्यकर्त्यांना दिली आहे.

इजिदोर फर्नांडिस   

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी भूमिका जाहीर करतील. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उत्पल पर्रीकर 

उत्पल पर्रीकरांना भाजपने पणजीतून वगळून डिचोलीतून उमेदवारीचा प्रस्ताव दिला आहे. परंतु, उत्पल पणजीतूनच लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे ते भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पणजीतून अपक्ष लढण्याची शक्यता वाढली आहे.

दीपक प्रभू पाऊस्कर

सावर्डेचे आमदार दीपक प्रभू पाऊस्कर यांनी गुरुवारी सायंकाळी समर्थकांची बैठक घेत, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. लवकरच ते मंत्रिपद, आमदारकी आणि भाजपचा राजीनामा देतील.

सावित्री कवळेकर

सावत्री बाबू कवळेकर यांनी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, अपक्ष म्हणून सांगेतून निवडणूक लढवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

भाजपने जाहीर केलेले उमेदवार
१) साखळी : डॉ. प्रमोद सावंत
२) मांद्रे : दयानंद सोपटे
३) पेडणे : प्रवीण आर्लेकर
४) थिवी : नीळकंठ हळर्णकर
५) म्हापसा : जोशुआ डिसोझा
६) शिवोली : दयानंद मांद्रेकर
७) साळगाव : जयेश साळगावकर
८) पर्वरी : रोहन खंवटे
९) हळदोणा : ग्लेन टिकलो
१०) पणजी : बाबूश मोन्सेरात
११) ताळगाव : जेनिफर मोन्सेरात
१२) सांतआंद्रे : फ्रान्सिस सिल्वेरा
१३) मये : प्रेमेंद्र शेट
१४) पर्ये : दिव्या राणे
१५) वाळपई : विश्वजीत राणे
१६) प्रियोळ : गोविंद गावडे
१७) फोंडा : रवी नाईक
१८) शिरोडा : सुभाष शिरोडकर
१९) मडकई : सुदेश भिंगी
२०) मुरगाव : मिलिंद नाईक
२१) वास्को : कृष्णा (दाजी) साळकर
२२) दाबोळी : मॉविन गुदिन्हो
२३) नुवे : दत्ता बोरकर
२४) फातोर्डा : दामू नाईक
२५) मडगाव : मनोहर (बाबू) आजगावकर
२६) बाणावली : दामोदर बांदोडकर
२७) नावेली : उल्हास तुयेकर
२८) कुंकळ्ळी : क्लाफासियो डायस
२९) वेळ्ळी : सावियो रॉड्रिगीस
३०) केपे : चंद्रकांत (बाबू) कवळेकर
३१) कुडचडे : नीलेश काब्राल
३२) सावर्डे : गणेश गावकर
३३) सांगे : सुभाष फळदेसाई
३४) काणकोण : रमेश तवडकर
.....................................
या मतदारसंघांतील उमेदवार घोषणा शिल्लक
१) डिचोली
२) सांताक्रूज
३) कुंभारजुवे
४) कुठ्ठाळी
५) कळंगुट
६) कुडतरी

हेही वाचा