काँग्रेसला दिलेले मत भाजपला मिळते !

तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी : काँग्रेसवर सडकून टीका


20th January 2022, 11:50 pm
काँग्रेसला दिलेले मत भाजपला मिळते !

पणजी : काँग्रेसची भाजपसोबत छुपी युती आहे. काँग्रेसला मिळालेले मत हे थेट भाजपला मिळालेले मत आहे. काँग्रेस भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली तर चिदंबरम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, असे आव्हान अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी चिदंबरम यांना दिले. गोमंतकीयांची दिशाभूल केल्याबद्दल आणि गोव्याच्या व्यापक हितासाठी युती करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले.

पणजी येथील कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बॅनर्जी बोलत होते. यावेळी पक्षाचे युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर आणि महिला उपाध्यक्ष प्रतिभा बोरकर उपस्थित होते. अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल भाजपविरोधी मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाकारला. ते म्हणाले, तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये भाजपविरोधी शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. फक्त मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती, तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा इतर काँग्रेसशासित राज्यांमध्ये निवडणुका लढवल्या असत्या. पण आम्ही भाजपचे सरकार असलेल्या त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि गोव्यात आलो.

फालेरो नाराज नाहीत

आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्स यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याबद्दल छेडले असता बॅनर्जी म्हणाले, ज्यांना गोव्यासाठी लढायचे आहे ते राहू शकतात. ज्यांना स्वार्थासाठी लढायचे आहे, ते पक्ष सोडून जाऊ शकतात. लुईझिन फालेरो फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नाराज आहेत का, असा प्रश्न केला असता, बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, कोणतीही नाराजी नाही. आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो हे सैनिक आहेत. ते विश्वासघातकी इन चीफ (विजय सरदेसाई) विरोधात लढणार आहेत.

काँग्रेसला गोमंतकीयांना मूर्ख बनवू देणार नाही!

चिदंबरम यांचा दावा आहे की, त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. असे सांगून ते गोमंतकीयांची दिशाभूल करत आहेत. ढोंगीपणाला मर्यादा असावी. आज त्यांचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. तृणमल काँग्रेसचे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी २४ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता चिदंबरम यांच्या दिल्लीतील घरी जाऊन त्यांना गोव्यात युती करण्याचे आवाहन केले होते. पण संभाव्य युतीबद्दल चर्चेला येण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली नाही. माझे म्हणणे चुकीचे असेल, तर चिदंबरम यांनी माझ्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करावा. तृणमूल आता काँग्रेसला गोमंतकीयांना मूर्ख बनवू देणार नाही.


हेही वाचा