डिचोलीचा प्रस्ताव उत्पलनी नाकारला!

पणजीतूनच अपक्ष लढण्याची शक्यता वाढली


21st January 2022, 12:49 am
डिचोलीचा प्रस्ताव उत्पलनी नाकारला!

उत्पल पर्रीकर


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजीतून डावललेल्या उत्पल पर्रीकर यांना भाजपने डिचोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. परंतु, गुरुवारी पत्रकारांशी बोलताना उत्पल यांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळत आपण आपला पर्याय तयार ठेवल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उत्पल पणजीतूनच अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दिल्लीतून भाजप उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांशी उत्पल पर्रीकरांच्या विषयावर छेडले. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर भाजपचे मोठे नेते होते. पर्रीकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिलेला आहे. पक्षाने यावेळी पणजीतून विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचा निर्णय घेत, उत्पल यांना इतर दोन जागांपैकी एका जागेवरून लढण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. त्यापैकी एका जागेसाठी त्यांनी अगोदरच नकार दर्शवला आहे. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू असून, लवकरच त्यावर अंतिम तोडगा निघेल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने उत्पल यांना डिचोलीतून निवडणूक लढवण्याची गळ घातल्याचे स्पष्ट झाले. त्यासंदर्भात पत्रकारांनी उत्पल पर्रीकर यांची भूमिका जाणून घेतली असता, भाजपने आपल्या नावाचा डिचोलीसाठी विचार सुरू केला असला तरी डिचोलीतून लढण्याची आपली अजिबात इच्छा नाही. किंबहूना आपण तेथून निवडणूक लढवणारही नाही. आपण आपल्या पर्यायांवर विचार केला असून लवकरच ते स्पष्ट करेन, असे त्यांनी सांगितले. उत्पल यांच्या या भूमिकेवरून त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचे निश्चित केल्याचे दिसून येत आहे. उत्पल कोणते पाऊल उचलणार हे पुढील काहीच दिवसांत स्पष्ट होणार आहे.
सक्षम उमेदवार नसल्याने उत्पलला गळ?
सभापती तथा डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी आरोग्याच्या कारणास्तव यावेळी निवडणूक न लढवण्याचे पक्षाला अगोदरच सांगितले होते. त्यामुळे पक्षाने मगोचे डिचोलीतील नेते नरेश सावळ आणि अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना गळ घातली होती. परंतु, या दोघांनीही भाजपची उमेदवारी घेण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे येथील उमेदवारी शिल्पा नाईक यांनाच द्यावी लागणार होती. शिल्पा नाईक जिंकतील यावर भाजपचा विश्वास नसल्याने पक्षाने आता ही जागा उत्पल पर्रीकरांना देऊन त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.