अपक्ष लढण्यासाठी आग्रह

लक्ष्मीकांत पार्सेकर देणार भाजप जाहीरनामा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा


21st January 2022, 12:50 am
अपक्ष लढण्यासाठी आग्रह

लक्ष्मीकांत पार्सेकर


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : अपेक्षेनुसार मांद्रेची उमेदवारी आमदार दयानंद सोपटे यांना जाहीर झाल्यानंतर सोपटे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे समर्थक पुन्हा एकदा निराश झाले आहेत. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समर्थकांची एक महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी पार्सेकर यांनी ही निवडणूक वेळप्रसंगी अपक्ष म्हणून लढवावी, असा आग्रह धरला. पक्षाने पार्सेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, येत्या तीन दिवसांत आपण निर्णय घेणार, तोपर्यंत भाजप जाहीरनामा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय पार्सेकर यांनी घेतला आहे.
मागच्या दोन वर्षांपासून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे २०२२च्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी ही आपल्यालाच मिळणार हे काल-परवापासून म्हणत होते. मात्र, भाजपने त्यांच्या पदरात निराशेचे माप देत आमदार दयानंद सोपटे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन सोपटे यांचे अस्तित्व कायम राखण्यास मदत केली आहे.
आमदार सोपटे यांनी मांद्रे मतदारसंघात आपली शक्ती कायम ठेवली होती. प्रत्येक बैठकीला शेकडो, हजारो समर्थकांची हजेरी असायची त्यावरूनच ज्येष्ठ नेत्यांना दखल घेऊन सोपटे यांना उमेदवारी द्यावी लागली. आता जे काही पार्सेकर यांचे समर्थक आहे ते कुणाच्या बाजूने राहतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, पार्सेकर यांचे अनेक समर्थक गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संघटित होऊन निर्णय घेणार
येत्या तीन दिवसांत आपण निर्णय घेणार, तोपर्यंत भाजप जाहीरनामा समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतला आहे. दरम्यान, आपल्यावर पक्षाने अन्याय केला नसून तर काही व्यक्तींनी केल्याचे ते म्हणाले. गेली पाच वर्षे आमदार सोपटे यांचे मांद्रे मतदारसंघात दुर्लक्ष राहिल्याचा ठपका पार्सेकर यांनी ठेवला. आता आम्ही मागून नव्हे, तर संघटित होवून निर्णय घेऊया, असेही त्यांनी जाहीर केले.