मयेतून भाजपतर्फे लढणार प्रेमेंद्र शेट

अनेक उमेदवार रिंगणात उतरणार : चुरस वाढणार


21st January 2022, 12:52 am
मयेतून भाजपतर्फे लढणार प्रेमेंद्र शेट

प्रति​निधी। गोवन वार्ता
डिचोली : मये मतदारसंघातून अखेर अपेक्षेप्रमाणे प्रेमेंद्र शेट यांची भाजप उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर झाल्याने गेले अनेक दिवस सुरू असलेल्या अफवांना विराम मिळाला आहे. पक्षाने जो विश्वास दाखवला आहे त्याचे सार्थक करण्यासाठी पूर्णपणे कार्यमग्न होऊन प्रचार करणार असून भाजपचे सर्व नेते, मंडळ समिती व आमचे हजारो कार्यकर्ते यांच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणे मार्गक्रमण करण्यास सिद्ध असल्याचे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
मये मतदारसंघातून आमदार प्रवीण झांट्ये यांना भाजपची उमेदवारी डावलण्यात आली. त्यापूर्वी मगो पक्षात गेलेले प्रेमेंद्र शेट यांना भाजपने स्वगृही आणून उमेदवारी बहाल केली. दुसरीकडे भाजपसाठी मिलिंद पिळगावकर. रूपेश ठाणेकर यांची फिल्डिंग सुरू होती. मात्र, पक्षनेते प्रेमेंद्र शेट यांनाच उमेदवारी देऊन त्यांनी शब्द राखला. मयेतून काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीचे संतोषकुमार यांची उमेदवारी निश्चित होऊन प्रचार सुरू केला. काँग्रेस युवा नेते अजय प्रभुगावकर यांना उमेदवारीची हमी देऊन अखेर डावलण्यात आल्याने त्यांनी व गट समितीने काँग्रेसचा राजीनामा देऊन अपक्ष वाट धरण्याची तयारी केली आहे. मिलिंद पिळगावकर यांनीही निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. रोहन सावईकर यांनीही अपक्ष लढण्याची तयारी ठेवली आहे. प्रवीण झांट्ये यांना मगोची उमेदवारी मिळणार असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. आम आदमीतर्फे प्रा. राजेश कळंगुटकर उमेदवार आहेत. याशिवाय अजूनही काही उमेदवार रिंगणात उडी घेण्याच्या तयारीत आहेत.
मये मतदारसंघात भाजपची कार्यकर्ता फळी मजबूत आहे त्याचा फायदा उठवण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले. इतर अनेक उमेदवार यांची कार्यकर्ता फळी त्यांचे कार्यक्रम व नियोजन यांवर त्या त्या उमेदवाराचे वजन काही दिवसात सिद्ध होणार आहे. काही उमेदवार भाजपच्या विरोधात एकत्र येण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र, आजच्या घडीला तशी अवस्था दिसत नाही. प्रवीण झांट्ये हे आपल्यापरीने सक्षमपणे कार्य करीत आहेत. त्यांना विविध स्तरावर पाठिंबा मिळाला तर लढती तुल्यबळ ठरतील. अजय प्रभुगावकर मिलिंद पिळगावकर, राजेश कळंगुटकर, संतोषकुमार सावंत हे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यामुळे कुणालाच गृहीत धरता येणार नाही, हे निश्चित.
मये मतदारसंघातील लढत होणार रंगतदार
मयेतील माजी आमदार स्व. अनंत शेट यांना मागील निवडणुकीत उमेदवारी डावलून ती प्रवीण झांट्ये यांना दिली होती तर या वेळेला झांट्ये यांना डावलून प्रेमेंद्र शेट यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मयेतील लढत रंगतदार होणार असून अनेक मुद्दे चर्चिले जातील, हे निश्चित. आगामी आठ दिवसांत कोणते उमेदवार एकत्र येतात त्यावर राजकीय समीकरण निश्चित होणार आहे. त्यामुळे निश्चितच मये मतदारसंघावर जनतेची नजर राहणार आहे.