दुबईच्या वाळवंटात महापूर! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात का पडला? वाचा कारण

कृत्रिमरित्या पाऊस पाडला जाणाऱ्या देशांना नैसर्गिक पावसाने का झोडपले?

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th April, 10:50 am
दुबईच्या वाळवंटात महापूर! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात का पडला? वाचा कारण

दुबई : संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बहरीन आणि ओमान या चार आखाती देशांमध्ये मंगळवारपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. तीव्र उष्मा असलेल्या या वाळवंटी भागात एवढा पाऊस पडेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. यूएईमध्ये गेल्या ७५ वर्षांत विक्रमी पावसाची नोंद झाल्याचे बोलले जात आहे. जवळपास दोन वर्षांत इथे जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस एकाच दिवसात पडला आहे. यामुळे चारही देशांमध्ये अनेक भागांत महापूर आले आहेत. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे निसर्ग कल्पनेच्या पलिकेडे कोपल्याचे स्पष्ट होत आहे.


हवामान बिघडल्याने जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशनवर गंभीर परिणाम झाला आणि बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे ३०० उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दुबईच्या शेजारच्या ओमानमध्ये पावसामुळे १९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान असेच राहण्याची शक्यता संबंधित देशांच्या हवामान विभागांनी वर्तवली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष्य या घटनेवर केंद्रित झाले आहे.


लोक म्हणतात हा ‘कृत्रिम पावसा’चा दोष

काही लोक या पावसासाठी क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाला दोष देत आहेत, जी आखाती देशांमध्ये पाऊस पाडण्याची एक सामान्य पद्धत बनली आहे. परंतु आखाती देशांमध्ये क्लाउड सीडिंगद्वारे एवढा पाऊस पडणे शक्य नाही आणि तेही अधूनमधून, कारण तेथे ढगांचा थर पातळ आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.


आगामी काळात भयंकर दुष्काळाची शक्यता

वास्तविक, जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील हवामान आणखी बदलले आहे. अमेरिका आणि युरोपच्या थंड प्रदेशांना नुकताच भीषण उष्णतेचा तडाखा बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे हिमालयापासून दूर अंटार्क्टिकापर्यंतचा बर्फ वितळत असून सर्वत्र हवामानाचा समतोल ढासळला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतेचे चटके दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. थंडी हा ऋतूच जणू लुप्त होत चालला आहे. याचा परिणाम म्हणजे आगामी काळात भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.


हवामान बदल ही एक निरंतर प्रक्रिया आहे. यापूर्वीही हवामानात विचित्र बदल झाले आहेत. परंतु सध्या ज्या गतीने बदल घडत आहेत, ते अत्यंत गंभीर आहेत. मानवाने सुरू ठेवलेल्या अंधाधुंद आणि अनियोजित विकासामुळे निसर्गाशी एवढी छेडछाड झाली आहे की, हवामान बदलाचा वेग भयंकर झाला आहे. शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी अनेक दिवसांपासून याबाबत इशारे देत असले तरी तात्काळ सुखसोयी वाढवण्याच्या हव्यासापोटी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.


हवामान बदलामुळे पूर किंवा दुष्काळाची समस्या तर गंभीर होत चालली आहेच, पण अशी संकटे येत आहेत, ज्याचा याआधी विचारही कोणी केला नव्हता. सुमारे चार वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील कोट्यवधी टोळांनी पिकांचा अशा प्रकारे नाश केला की त्या भागात अन्न संकट आले. करोना महामारी क्वचितच कोणी विसरू शकेल. या सगळ्यात हवामान बदलाचाही हात आहे. जर आपण आताच सावध राहिलो नाही तर भविष्यात आपल्या हाती काही उरणार नाही, असा गंभीर इशारा पुन्हा हवामान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा