नवोदयमधील प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रातील २५ मुले; उ. गोव्यातील पालकांचा आक्षेप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 02:48 pm
नवोदयमधील प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रातील २५ मुले; उ. गोव्यातील पालकांचा आक्षेप

वाळपई : येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये केवळ उत्तर गोव्यातील मुलांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे. तरीही इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रातील २५ मुलांना प्रवेश दिल्याने नाराज पालकांनी सत्तरीच्या मामलेदारांना निवेदन दिले आहे. यावर मामलेदारांनी विद्यालयाकडे चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, अद्याप या मुलांना प्रवेश दिलेला नाही. पण, प्रवेश दिल्याचे जाहीर झाल्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा पालकांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील २५ मुलांनी खोटी कागदपत्रे जोडून इयत्ता सहावीसाठी प्रवेश परीक्षेत भाग घेतला. ही मुले उत्तीर्ण झाली आहेत. १८ एप्रिलपासून उत्तीर्ण झालेल्या मुलांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे उत्तर गोव्यातील पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. मुळात या विद्यालयात केवळ उत्तर गोव्यातील मुलांनाच प्रवेश देणे बंधनकारक आहे. मग महाराष्ट्रातील मुलांना प्रवेश परीक्षेला कसे बसू दिले, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. यामुळे स्थानिक २५ मुलांवर अन्याय झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सत्तरी तालुक्याच्या मामलेदारांना निवेदन देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. मामलेदारांनी हे निवेदन शाळा व्यवस्थापनाला पाठवले आहे. दरम्यान, विद्यालयाने याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच २५ पैकी कोणत्याही मुलाला अद्याप प्रवेशही दिलेला नाही. पण, या प्र‌क्रियेत सावळा गोंधळ झाला आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.

हेही वाचा