केनियाला भीषण महापुराचा वेढा; ३८ ठार, १.१० लाख नागरिक बेघर!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th April, 05:14 pm
केनियाला भीषण महापुराचा वेढा; ३८ ठार, १.१० लाख नागरिक बेघर!

नायरोबी : केनियामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. काल मध्यरात्रीपासून तर मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी देशाच्या बहुतांश भागाला महापुराने वेढले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आज सकाळपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख १० हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. जमिनी खचल्याने अनेक भागांतील रस्त्यांचे जाळे नष्ट झाले आहे. तर, शेतीही पाण्याखाली गेली आहे. केनिया रेड क्रॉसच्या आपत्ती ऑपरेशन्सचे प्रमुख वेनांट एनदिघिला यांनी याची सविस्तर माहिती जारी केली आहे.

केनियात आलेल्या विनाशकारी महापुरामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, अनेक ठिकाणी धरणेही फुटली आहे. रुग्णालयांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. देशभरातील काही प्रमुख महामार्ग, रस्त्ये खचल्याने ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. या महापुरात आम्ही ३८ लोक गमावले आहेत आणि १.१० लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत, असे वेनांट एनदिघिला यांनी म्हटले आहे.

या महापुरात आम्ही सर्व काही गमावले आहे. आमच्याकडे स्टोअरमध्ये जे थोडे अन्न होते, तेही पाण्यात वाहून गेले आहे. घरे पाण्यात बुडाली आहेत. काही स्थानिक शाळा आणि रुग्णालयेही पाण्याखाली आहेत, अशी माहिती पश्चिम केनियातील अहेरो प्रदेशातील भात शेतकरी एनेट अकिनी यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले आहे.

केनिया रेड क्रॉसने परिस्थिती वेगाने नियंत्रणाबाहेर जात आहे. आरोग्य आणि पोषण यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिली आहे. दरम्यान, केनियाच्या हवामान खात्याने पुढच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे केनियाचे अधिकारी आणि मानवतावादी एजन्सींनी फ्लॅश पूर येण्याची शक्यता असलेल्या सखल भागात राहणाऱ्या रहिवाशांना उंच आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश जारी केले आहेत.

हवामान सेवेचे संचालक डेव्हिड गिकुंगू यांनी दिलेल्या माहितीनुसार, केनियामध्ये एप्रिलमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर येणे असामान्य नाही. कारण देशात सामान्यतः दोन पावसाळी हंगाम येतात. मार्च ते मेपर्यंत दीर्घकाळ पाऊस आणि ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत कमी पाऊस असतो. पण, असा मुसळधार पाऊस पडत नाही. तथापि, हवामानातील बदलामुळे ऋतू अधिक तीव्र झाल्याचा हा परिणाम आहे.

केनिया आणि जगभरातील इतर अनेक प्रदेशांमध्ये महापूर येण्याच्या घटना सुरू आहेत. हवामानातील बदलामुळे उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पाण्याची अधिक वाफ वातावरणात बाष्पीभवन होऊ जात आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या घटना घडत आहेत. याच कारणाने ऋतूचक्रात बिघाड झाला आहे, असा दावाही डेव्हिड यांनी केला आहे.

हेही वाचा