संविधानानंतर आता तिरंग्यावरून भाजपचा विरियातोंवर निशाणा !

काँग्रेसचेही चोख प्रत्युत्तर; तानावडे-पाटकर पुन्हा आमनेसामने


25th April, 12:09 am
संविधानानंतर आता तिरंग्यावरून भाजपचा विरियातोंवर निशाणा !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : संविधानविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्यासह काँग्रेसवर भाजप नेत्यांकडून टीकास्त्र सुरू असतानाच विरियातो फर्नांडिस यांनी सेंट जेसिंटो बेटावर तिरंगा फडकावण्यास आक्षेप घेतला होता, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी केला. तानावडेंचा हा दावा खोटा असून विरियातो यांनी मध्यस्थी​ केल्यामुळेच तेथे तिंरगा फडकला, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिले.
बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना, गोमंतकीयांवर संविधान लादले असे वक्तव्य करणारे विरियातो दुटप्पी आहेत. ते आपण नौदलात होतो असे सांगतात. मात्र त्यांनी याआधीही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. १५ ऑगस्ट रोजी वास्को येथील सेंट जेसिंटो बेटावर तिरंगा ध्वज फडकावण्यास त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर एका फादरने छ. शिवाजी महाराजांसंदर्भात अपशब्द वापरले होते, त्यावेळीही त्यांनी समर्थन केले होते. विरियातो गोव्यातील एकोपा बिघडवू पाहत आहेत, अशी टीका तानावडे यांनी केली.
यावर अमित पाटकर म्हणाले, सेंट जेसिंटो बेटावर १३ ऑगस्ट रोजी भारतीय नौदलाचे अधिकारी खुदाई करत होते. स्थानिक मच्छिमारांनी त्याला आक्षेप घेतला. १४ ऑगस्ट रोजी काही नेत्यांनी तेथे धाव घेतली. त्यामुळे बेटावर गोंधळ माजला. नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने विरियातो यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. त्यानंतर विरियातो तत्काळ बेटावर पोहोचले आणि दुपारी तेथे तिरंगा फडकावला. गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांना आमंत्रण न देणाऱ्या सरकार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये.

आमदार संकल्प आमोणकरांकडून तक्रार
संविधान गोमंतकीयांवर लादण्यात आल्याचे वक्तव्य करून कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी राष्ट्राचा व संविधानाचा अपमान केला आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सन्मान कायदा १९७१ अंतर्गत गुन्हा नोंद करा, अशी तक्रार भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांनी बुधवारी कोलवा पोलिसांत केली.

हेही वाचा