तीन महिन्यांतच ४२६ गोमंतकीयांनी त्यागले भारतीय नागरिकत्व

दक्षिण गोव्यातील लोकांची संख्या अधिक : सर्वाधिक लोकांनी स्वीकारले पोर्तुगालचे नागरिकत्व

Story: प्रसाद शेट काणकाेणकर |
25th April, 06:16 am
तीन महिन्यांतच ४२६ गोमंतकीयांनी त्यागले भारतीय नागरिकत्व


गोवन वार्ता

पणजी :  राज्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या तीन महिन्यांत तब्बल ४२६ जणांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे. यातील सर्वाधिक ४१८ जणांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले आहे. याशिवाय फक्त ८ जणांनी इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांमध्ये फक्त ८९ जण उत्तर गोव्यातील, तर ३३७ नागरिक दक्षिण गोव्यातील आहेत.  यात सर्वाधिक २३२ जण एका सासष्टी तालुक्यातील आहेत. ही आकडेवारी पाहिली असता, दररोज सरासरी ४ ते ५ नागरिक भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.            

गोव्यावर पोर्तुगिजांचे ४५० वर्षे राज्य होते. १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून गोवा मुक्त झाला. १९६१ पूर्वी जन्मलेल्या अनेक गोमंतकीय नागरिकांची पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी झाली आहे. केवळ पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी असल्यामुळे तो पोर्तुगीज नागरिक होत नाही. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळेपर्यंत भारतीय पासपोर्ट रद्द करता येत नाही. असे असताना अनेक नागरिक पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्यात अग्रेसर असतात. पोर्तुगीज नागरिकत्व मिळाल्यानंतर भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत.

भारतात दुहेरी नागरिकत्वाचा कायदा नसल्यामुळे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारताच भारतीय नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो. गेल्या काही वर्षांत पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्यात गोमंतकीयाचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश मंडळी नोकरीसाठी परदेशात जातात. तेथील सुविधांमुळे नंतर तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. गोव्यात पूर्वी पोर्तुगितांचे राज्य होते. त्यामुळे बहुतांश नागरिक पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याला प्राधान्य देत आहेत. पोर्तुगीज नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना युरोपियन देशांमधील अनेक लाभ मिळतात. भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यामागे हेही एक मुख्य कारण आहे.

उत्तर गोव्यातील ८९ जणांनी सोडले नागरिकत्व

मागील तीन महिन्यांच्या आकडेवारीवर नजर फिरवल्यास ४२६ जणांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे, हे लक्षात येते. यात सर्वाधिक ३३७ नागरिक दक्षिण गोव्यातील, तर फक्त ८९ जण उत्तर गोव्यातील आहेत. २३२ जण हे एका सासष्टी तालुक्यातील आहेत. भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या ४२६ पैकी ४१८ जणांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले आहे. तिघांनी कॅनडा, दोघांनी यूके,  तर प्रत्येकी एकाने रशिया, पोलंड आणि जर्मनीचे नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा