ऋषभ-अक्षरच्या वादळात गुजरात नेस्तनाबूत

दिल्लीचा चार धावांनी विजय : डेव्हिड मिलर, साईसुदर्शनची झुंज निष्फळ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:39 am
ऋषभ-अक्षरच्या वादळात गुजरात नेस्तनाबूत

नवी दिल्ली : ऋषभ पंतच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला गुजरात टायटन्सवर विजय मिळवता आला. ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजीची हवाच काढली. या दोघांनीही दमदार अर्धशतके झळकावली आणि या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजीचा फटका गुजरातच्या संघाला बसला. दिल्लीने पंत आणि अक्षर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर २२४ धावांचा डोंगर रचला होता. या आव्हानाचा चांगला पाठलाग गुजरातने करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना हा सामना जिंकता आला नाही. राशिद खानने अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना खेचला होता, पण दिल्लीने चार धावांनी विजय साकारला. दिल्लीचा हा या हंगामातील ९ व्या सामन्यांतील चौथा विजय ठरला.

दिल्लीच्या २२५ धावांचा सामना करण्यासाठी गुजरातचा संघ मैदानात उतरला खरा, पण कर्णधार शुबमन गिलच्या रुपात त्यांना पहिला धक्का बसला. गिलला यावेळी फक्त सहा धावा करता आल्या. गिल बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने दिल्लीच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. साईने यावेळी वृद्धिमान साहाच्या साथीने संघाला ९५ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण त्यावेळी साहा ३९ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटला. पण त्यानंतर साई आणि डेव्हिड मिलर यांची चांगली जोडी जमेल असे वाटत होते. कारण साई धडाकेबाज फटकेबाजी करत होता आणि त्याचे अर्धशतकही झाले होते. त्यामुळे हे दोघे संघाला विजय मिळवून देतील, असे वाटत होते. पण यावेळी साई बाद झाला आणि गुजरातला मोठा धक्का बसला. साईने यावेळी ३९ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६९ धावा केल्या.

साई बाद झाला आणि त्यानंतर गुजरातचे अजून दोन फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे गुजरातच्या विजयाची आशा यावेळी डेव्हिड मिलरवर होती. मिलरने अर्धशतकी पूर्ण केले. पण अर्धशतक झळकावल्यावर मिलर जास्त काळ टिकू शकला नाही आणि दिल्लीच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. मिलरने यावेळी २३ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या.


दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली तर दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेलने ६६, ऋषभ पंतने ८८, जॅक मेकर्कने २३, पृथ्वी शॉने ११ तर स्टब्सने २६ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ५ गडी गमावून २२४ धावांची खेळी केली. तर गुजरात टायटन्स टायटन्सच्या गोलंदाजांपैकी संदीप वॉरिअरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर नूर अहमदने १ विकेट घेतली.

शुबमन गिलची ​विशेष कामगिरी

गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात एक विशेष कामगिरी केली आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा १०० वा सामना ठरला. यासह तो पंड्या-पंतसारख्या दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आयपीएलमध्ये १०० सामने खेळणारा हा युवा फलंदाज ६५ वा खेळाडू आहे. अलीकडेच हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये १०० वा सामना खेळला. २२ एप्रिल रोजी राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात या विशेष कामगिरीबद्दल मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने पंड्याचा गौरव केला.

१०० वा सामना खेळणारा सर्वांत तरुण खेळाडू 

आयपीएलमध्ये १०० सामने खेळणारा शुबमन गिल हा दुसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या २४ वर्षे २२९ दिवसांत तो १०० वा आयपीएल सामना खेळला.  तर राशिद खान या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने वयाच्या २४ वर्षे २२१ दिवसांत १०० वा आयपीएल सामना खेळला होता.

मोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा या सामन्यात चांगलाच महागडा ठरला. त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ७३ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. यासह त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा स्पेल टाकण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम बेसिल थम्पीच्या नावावर होता. बेसिल थम्पीने २०१८ मध्ये ४ षटकात ७० धावा दिल्या होत्या. त्याचबरोबर यश दयाल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यश दयालने गुजरात टायटन्सकडून खेळताना ४ षटकात ६९ धावा दिल्या होत्या. ज्यात त्याच्या एका षटकात रिंकू सिंगने पाच षटकारही मारले होते.

हेही वाचा