मोलेत थरार... रात्री धावत्या ट्रकने घेतला पेट! सुमारे ६ लाखांचा माल जळून खाक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd May, 09:55 am
मोलेत थरार... रात्री धावत्या ट्रकने घेतला पेट! सुमारे ६ लाखांचा माल जळून खाक

फोंडा : मोले येथील वन खात्याच्या गेटसमोर बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कर्नाटकमधून गोव्यात येणाऱ्या मालवाहू ट्रकला आग लागून अंदाजे ५-६ लाख रुपयांचे नुकसान झाले. फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचण्यापूर्वी तपासनाक्यावर असलेल्या पोलिसांनी वन खात्याच्या टँकरच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत ट्रकमध्ये असलेला माल जळून खाक झाला आहे.

केए-२२बी-६७२३ क्रमांकाचा ट्रक कर्नाटकमधून गोव्याच्या दिशेने येत होता. अनमोड घाटात ट्रक चालकाला मागाहून धूर येत असल्याचे निर्देशनात आले होते. टायरमधून येत असल्याचे समजून चालकाने ट्रक मोले गेटपर्यंत नेला. त्यावेळी ट्रकच्या मागील भागात मोठी आग लागली होती. ट्रकला आग लागल्याचे दिसून आल्यानंतर तपास नाक्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानी जवळच असलेल्या वन खात्याच्या टँकरच्या पाण्यातून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अंदाजे अर्ध्या तासानंतर फोंडा अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी आगीवर नियंत्रण ठेवले. आगीत ट्रक मध्ये अंदाजे ५-६ लाख रुपये किंमतीचा असलेला माल जळून गेला आहे. 

कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सदानंद देसाई, हवालदार गौरेश सांगोडकर, धुलो शेंगडी, संदीप नाईक, आनंद गावडे, वन खात्याचे कर्मचारी राजा, फोंडा अग्निशमन दलाचे हवालदार संतोष गावकर, गणेश गावडे (चालक), जितेंद्र भंडारी, आवेश प्रभुगावकर, विशांत गावकर व प्रमोद नाईक यांनी आग विझविण्यात सहकार्य केले.

हेही वाचा