भाजप-काँग्रेसकडून निव्वळ धर्माचे राजकारण, ४ जूनला मिळेल उत्तर : मनोज परब

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 04:07 pm
भाजप-काँग्रेसकडून निव्वळ धर्माचे राजकारण, ४ जूनला मिळेल उत्तर : मनोज परब

पणजी : लोकसभा निवडणुकीत गोवेकरांनी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षावरील (आरजीपी) प्रेम दाखवून दिले आहे. भाजपप्रमाणे आम्हाला तर्कवितर्क लढवण्यात कोणताही रस नाही. त्यांना याचे उत्तर ४ जून रोजी मतदारच देतील. तेव्हाच आरजीपीला किती मतांची आघाडी मिळाली, हेही स्पष्ट होईल, असे प्रत्युत्तर आरजीपीचे संस्थापक तथा उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब यांनी दिले आहे.

येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत परब बोलत होते. यावेळी पक्षाचे दक्षिण गोवा
उमेदवार रुबर्ट परेरा, सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर आणि इतर पदाधिकारी
उपस्थित होते. भाजपला उत्तरेत १ लाख आणि दक्षिणेत ६० हजारांची आघाडी मिळेल, असे ते बोलत आहेत. त्यांना हे कसे कळाले, समजत नाही. त्यांच्याकडे ईव्हीएमची संपूर्ण यंत्रणा आहे, असे परब यावेळी म्हणाले. 

इतर राजकीय पक्षांप्रमाणे या निवडणुकीत आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही. निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही बिल्डर लॉबीकडून, कॅसिनोमधून
आम्ही पैसे घेतलेले नाहीत. केवळ गोवेकरांनी आपल्या घामाचे आणि कष्टाचे पैसे  देणग्या म्हणून दिले. त्यावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे गोवेकरांचे आरजीपीवर प्रेम असल्याचे स्पष्ट होते. आता गोवेकरांचा आवाज संसदेत पोहोचवण्यात आरजीपी अजिबात कसर सोडणार नाही, असेही परब यांनी म्हटले आहे.

‘भाजप-काँग्रेसकडून फक्त धर्माचे राजकारण’

भाजपकडून ‘हिंदू खतरे में’ आणि काँग्रेसकडून ‘ख्रिश्चन खतरे में’ असा नारा देऊन धर्मावर राजकारण केले जाते. या राजकारणामुळे प्रत्यक्षात गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. गोव्याच्या प्रश्नावर त्यांनी कधीही आवाज उठवला नाही. जर तुम्ही त्यांच्या राजकारणाला बळी पडलात तर, एक दिवस गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यात तेढ निर्माण होईल, अशी भीती मनोज परब यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा