‘स्मार्ट सिटी’ची ३१ मेची मुदत एका आठवड्याने वाढण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 11:28 pm
‘स्मार्ट सिटी’ची ३१ मेची मुदत एका आठवड्याने वाढण्याची शक्यता

पणजी : ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत सुरू असलेल्या कामात अनेक आव्हाने आहेत. असे असले तरी बहुतांश कामे ३१ मे पर्यंत पूर्ण होतील. मात्र काही छोटी कामे पूर्ण होण्यासाठी ३१ मे नंतर एका आठवड्याचा कालावधी लागू शकतो अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी दिली. 

गुरुवारी स्मार्ट सिटी कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत कंत्राटदार उपस्थित होते. रॉड्रिग्ज म्हणाले, आम्ही ३१ मे पर्यंत बहुतेक रस्ते सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे रस्ते काँक्रिटचे असल्याने काही ठिकाणी क्युअरिंग म्हणजे रस्ता बांधून झाल्यावर तो वाहतुकीसाठी योग्य होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, असे ते म्हणाले. आजच्या बैठकीत कंत्राटदारांना कामाच्या अंतिम मुदतीबाबत पुन्हा एकदा कल्पना देण्यात आली आहे. काळजी घेऊन कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. सध्या कंत्राटदार दिवस रात्र काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर देखील अतिरिक्त ताण देणे योग्य नाही, असे रॉड्रिग्ज म्हणाले.

पणजीत झालेल्या पावसावेळी स्मार्ट सिटीच्या ड्रेनेजची कामे पूर्ण झाली नव्हती. काही ठिकाणी पाणी साचून राहिले होते. ११ ते १३ दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रायबंदर ते चिंबल रस्त्यावर काम सुरू आहे. येथे पाण्याची पातळी जास्त असल्याने सांडपाणी वाहिनी घालण्यासाठी काही आव्हाने आहेत. असे असले तरी ३१ मे पर्यंत रायबंदर ते जुने गोवे या रस्त्याचे काम पूर्ण करून तो खुला केला जाईल, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

हेही वाचा