खाऱ्या पाण्यामुळे नेवरातील खाजन शेती उद्ध्वस्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 12:29 am
खाऱ्या पाण्यामुळे नेवरातील खाजन शेती उद्ध्वस्त

खाऱ्या पाण्याखाली गेलेले नेवरा ओ ग्रँडचे खाजन.

पणजी :
नेवरातील खाजन शेती खाऱ्या पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली आहे. खारे पाणी शेतात जाऊ नये म्हणून नवीन बांध घातला होता आणि मानशीची दारेही दुरुस्त केली होती, तरीही ही समस्या सुटलेली नाही. पूर्ण खाजन शेतीत खारे पाणी भरलेले असल्याने शेतकऱ्यांना शेती करायला मिळत नाही. शिवाय पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रोप लागवड केली आहे आणि भाजी लावलेली आहे, त्याचेही नुकसान होत आहे.
या संदर्भात बोलताना सांतआंद्रेचे आम आदमी पक्षाचे नेते रामराव वाघ यांनी सांगितले की, नेवरा ओ ग्रँड हे गोव्यातील सर्वांत मोठे खाजन आहे. २०१८ साली ९ कोटी रुपये खर्चून ६.५ किलोमीटर लांबीचा काँक्रिटचा बांध सरकारने बांधलेला आहे. पण कोटी रुपये खर्चूनही शेतीत खारे पाणी घुसत असल्यामुळे शेतकऱ्यांना लावणी करायला मिळत नाही.
या खाजनाला सात मानशी आहेत, त्यातील पाच मानशींचा लिलाव झालेला आहे. शेतीत खारे पाणी घुसण्याला मानशीकार जबाबदार आहेत, असा संशय आम्हाला आहे. नेवर ओ ग्रँड मुंडकार संघटनेने मामलेदारांच्या नेतृत्वाखाली या मानशीचा लिलाव केला होता. फक्त शेतकऱ्यांना मानशीचा लिलाव घ्यायला मिळतो, पण लिलाव घेतलेल्यांची नावे पाहिल्यास ते बाहेरचे असल्याचे दिसून आले आणि ते मुंडकार म्हणून त्यांची नोंदही नाही, असा आरोप वाघ यांनी केला आहे.

आमदारांकडून काणाडोळा!
अशा बेकायदेशीर कामांना समर्थन देणारे सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे खाजनाच्या दुर्दशेला जबाबदार आहेत. त्याशिवाय विद्यमान आमदार वीरेश बोरकर यांचे घर आणि शेतीसमोर हे खाजन आहे. तरीही त्यांनी खाजन शेतीच्या या दुर्दशेकडे डोळेझाक केलेली आहे, असा आरोप रामराव वाघ यांनी केला आहे.

मामलेदारांनी पाहणी करावी!
या खाजनापासून थोड्या अंतरावर काही शेतकऱ्यांनी भाजी आणि शेती केलेली आहे. खारे पाणी हळूहळू त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचलेले आहे. मामलेदारांनी या खाजनाची वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे आहे. मात्र ते आपले काम करत नाहीत. मामलेदारांनी या खाजनाची पाहणी करावी आणि या दुर्दशेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रामराव वाघ यांनी केली आहे.

हेही वाचा