मतांचा अंदाज चुकल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

‘आप’चे नेते अमित पालेकर यांची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 12:31 am
मतांचा अंदाज चुकल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!


पणजी :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दक्षिणेत ६० हजार मतांची आघाडी आणि उत्तरेत २० मतदारसंघात आघाडी घेऊन भाजप लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याची वक्तव्ये करत आहेत. हा त्यांचा अंदाज चुकल्यास डॉ. सावंत यांनी पक्षाची एक जबाबदारी व्यक्ती आणि मुख्यमंत्री या नात्याने राजीनामा द्यावा, असे आव्हान आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांनी केले आहे.
पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पालेकर बोलत होते. त्यांच्यासोबत आपचे नेते वाल्मिकी नाईक आणि जर्सन गोम्स उपस्थित होते.
जी वक्तव्ये मुख्यमंत्री करत आहेत, त्यावरून असे दिसून येते की ते इंडी आघाडीला घाबरलेले आहेत. ज्या अडचणीच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केव्हाच पाय सुद्धा ठेवला नव्हता, त्या ठिकाणी ते प्रथमच गेले. मोतीडोंगर आणि इतर भागाला त्यांनी केव्हाच भेट दिली नव्हती. आमच्या भीतीमुळे ते तेथे पोचले आणि तेथील लोकांना सतावणाऱ्या समस्याही त्यांनी पाहिल्या. त्याशिवाय तेथे लोकांनी त्यांना जाबही विचारला, असा आरोप पालेकर यांनी केला.
तीन महिन्यांपूर्वी झालेले इंडी आघाडीची मैत्री आता भक्कम झाली आहे. ही आघाडी पुढे सुद्धा राहणार आहे आणि २०२७ पर्यंत लोकांना ही आघाडी पहायला मिळणार आहे. या आघाडीला मुख्यमंत्र्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असा टोला पालेकर यांनी मुख्यमंत्र्यांना मारला.

कट्टर भाजप समर्थकांचीही इंडी आघाडीला मते!
महागाई, बेरोजगारी आणि इतर विषयांवरून लोक भाजपवर नाराज आहेत. भाजपला मते दिली, याचा त्यांना पश्चाताप होत आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कट्टर भाजप समर्थकांनीही यावेळी इंडी आघाडीला मते दिली आहेत, असा दावा वाल्मिकी नाईक यांनी केला.

हेही वाचा