सत्तरीतील व्रतस्थ धोंडगणांचे तळ गजबजले

हजारो धोंड भाविक ५० हून अधिक तळांवर व्रतस्थ

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 12:35 am
सत्तरीतील व्रतस्थ धोंडगणांचे तळ गजबजले

मासोर्डे येथे लईराई देवीचे व्रत करणारे धोंडगण.

वाळपई :
शिरगाव येथील लईराई देवीची जत्रा दि. १२ मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. यामुळे धोंड गणांच्या पवित्र व्रताला सुरुवात झालेली आहे. सत्तरी तालुक्यातील तळ गजबजू लागले आहेत. अनेक ठिकाणी धोंडगणांचे व्रत पहावयास मिळत आहेत.
तालुक्यात जवळपास ५० पेक्षा जास्त तळ आहेत. हजारो धोंडगण देवीचे व्रत करत आहेत. मंदिर किंवा नदीकाठच्या शेजारी पवित्र स्थानावर हे व्रत पाळले जात आहे. स्वतः स्वयंपाक करणे व देवीचा नामघोष करत हे व्रत पाळण्यात येत आहे. या धोंड मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. शैक्षणिक मदत, पर्यावरणासंबंधी जागृत करणे, वैचारिक जनजागृती अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून तळावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सुहास वझे यांच्याकडून अनेक तळांवर नामस्मरणसंबंधी जागृती होताना दिसत आहे.

घरातील धोंड परंपरा मी पुढे नेत आहे. पूर्वी वडील हे व्रत करत होते. त्यांचे देहावासन झाल्यानंतर आपल्यावर ही जबाबदारी आली. घरापासून अवघ्या अंतरावर इतर धोंड बांधव-भगिनींच्या सहवासात राहून एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य लाभते.
- देवीदास गावकर, म्हाऊस

मंदिराच्या शेजारी किंवा मंदिराच्या स्थानावर पवित्र व्रत करताना एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येत असते. ईश्वराची भक्ती करणे हाच जीवनाचा खरा मंत्र आहे.
स्वतः स्वयंपाक करणे व स्वतःची जबाबदारी घरापासून बाहेर राहत पूर्ण करणे यामध्ये वेगळ्याच प्रकारचा आनंद सामावलेला असतो.
- म्हाळू गावस, मासोर्डे  


नामस्मरणात सहभागी कोदाळ येथील देवीचे धोंडगण.