दोडामार्गमधील शेकडो धोंड व्रतस्थ

धोंडांचे गटनिहाय व्रतपालन : ‘सोवळे’ पालनासाठी वस्तीपासून दूर निवास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 12:37 am
दोडामार्गमधील शेकडो धोंड व्रतस्थ

झरेबांबर येथील श्री सातेरी ब्राह्मणेश्वर देवस्थानच्या आवारात सहभोजन करताना धोंड.

दोडामार्ग : डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवासाठी दोडामार्ग तालुक्यातील शेकडो धोंड भाविक बुधवारपासून शुचिर्भूत होऊन व्रतस्थ राहिले आहेत. विविध गावांमधील धोंड एकत्र आले असून गटागटाने व्रतपालन सुरू आहे. ‘सोवळे’ पाळण्यासाठी वस्तीपासून दूर निवास करून देवीची आराधना करण्यात ते मग्न आहेत.
श्री लईराई देवीचे भक्त किंवा धोंड गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व इतरही काही भागांत आहेत. जत्रेआधी किमान ५ दिवस ‘सोवळे’ पाळून देवीची आराधना ते करतात. त्यासाठी घरापासून दूर राहणे क्रमप्राप्त ठरते. शिरगावपासून जवळच असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील गावागावांत धोंड भाविकांकडून दरवर्षी व्रतपालन श्रद्धापूर्वक केले जाते. झरेबांबर, पिकुळे, घोटगेवाडी, पाळये, साटेली, उसप, मणेरी, आंबेली, विर्डी, तळेखोल, परमे, खानयाळे, फुकेरी, सासोली आदी गावांत धोंड भाविक सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करतात. यावर्षीही अनेक गावांत गटागटाने हे भाविक व्रतस्थ आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे झरेबांबर येथे २५ धोंड भाविकांनी श्री सातेरी ब्राह्मणेश्वर देवस्थानच्या आवारात वस्ती केली आहे. तेथीलच तळीवर आंघोळ केली जाते. मंदिराच्या आवारात धोंड स्वत: भोजन बनवतात.
जत्रेदिवशी हे धोंड स्वत:च्या वाहनाने शिरगाव येथील मंदिरात जातात व श्री लईराई देवीला मोगऱ्याचे कळे अर्पण करून आपले व्रत पूर्ण करतात. पूर्वी वाहतुकीची व्यवस्था मर्यादित होती, त्यावेळी हे धोंड दोडामार्गहून पायी चालत शिरगावला जात असत. यावर्षी झरेबांबर येथे अनिल शेटकर, मुकुंद शेटकर, बाबुराव रुरकी, सूर्यकांत गवस, चंद्रकांत जाधव, प्रसाद शेटकर, नारायण गवस, राजू शेटकर, संदीप खुटवळकर, सुरेश डोईफाेडे, रामचंद्र धुरी, संतोष गवस, फटी गवस आदी २५ धोंड व्रतस्थ आहेत.

व्रतासाठी धोंड घेतात कामातून ‘ब्रेक’
श्री लईराई देवीच्या जत्रेआधी पाच दिवस शुचिर्भूत राहून सोवळ्याचे पालन करायचे असल्याने धाेंड भाविक आपल्या कामाच्या ठिकाणी पाच दिवस रजा घेतात. गावातील पाणवठ्याची सोय असलेल्या ठिकाणी व्रतस्थ राहून जत्रेचा दिवस उजाडण्याची वाट बघतात. जत्रेदिवशी शिरगावमध्ये जाऊन आपले व्रत पूर्ण करतात.