आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत कायम

पंजाब किंग्सचा ६० धावांनी पराभव : कोहली, पाटीदारची अर्धशतके

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th May, 12:39 am
आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत कायम

धरमशाला : रनमशीन विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात २४१ धावांचा डोंगर उभारला. धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ १७ षटकांत १८१ धावाच करू शकला. पंजाबकडून रायली रुसोने ६१ धावांची खेळी केली. तर आरसीबीकडून सिराजने ३ गडी बाद केले. या विजयामुळे आरसीबी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना स्वप्निल सिंगने पहिल्या षटकात पंजाबच्या प्रभसिमरन सिंग ( ६) याला पायचीत केले. पण, त्यानंतर जॉनी बेअरस्टो व रायली रुसो ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी ३१ चेंडूंत ६५ धावा जोडल्या. बेअरस्टो १६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून २७ धावांवर बाद झाला. रुसोने २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून लढा सुरूच ठेवला होता. कर्ण शर्माने मॅचला कलाटणी दिली. रुसो २७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारासह ६१ धावांवर झेलबाद झाला. इम्पॅक्ट प्लेअर जितेश शर्मा (५) याचाही कर्ण शर्माने त्रिफळा उडवला. त्यानंतर स्वप्निलने पंजाबचा पाचवा फलंदाज माघारी पाठवताना लिएम लिव्हिंगस्टोन भोपळ्यावर बाद केले. १४ व्या षटकात विराटच्या भन्नाट थ्रोवर शशांक सिंग (३७) रन आऊट झाला आणि पंजाबला पराभव दिसू लागला.
मो​हम्मद सिराजने सामन्यातील त्याची पहिली विकेट मिळवताना आशुतोष शर्माला (८) पायचीत केले आणि त्यानंतर फर्ग्युसनने पंजाबची शेवटची आशा सॅम कुरनचा (२२) त्रिफळा उडवला. सिराजने आणखी २ विकेट घेताना हर्षल पटेल (०) व अर्शदीप सिंग (४) यांना बाद करून पंजाबचा संघ १८१ धावांत तंबूत पाठवला. बंगळुरूने ६१ धावांनी सामना जिंकला. बंगळुरुने विजय मिळवून १२ सामन्यांत गुणसंख्या १० वर नेली आहे आणि त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून १४ गुणांसह अजूनही प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा आहे. पण, इतरांच्या कामगिरीवर त्यांचे हे गणित अवलंबून असेल. मात्र या पराभवामुळे पंजाबची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा धूसर झाली आहे.
दरम्यान, पंजाबचा कर्णधार सॅम करन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धर्मशालाच्या मैदानावर आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार फॅफ डु प्लेसिस आणि विल जॅक्स स्वस्तात तंबूत परतले. पंजाबकडून पदार्पण करणाऱ्या विद्वात कवेरप्पा याने आरसीबीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. त्याने फाफ डु प्लेलिस आणि विल जॅक्स यांना स्वस्तात तंबूत परतले. फाफ डु प्लेलिसने ७ चेंडूमध्ये दोन चौकारांच्या मदतीने ९ धावा केल्या. तर विल जॅक्स याने सात चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२ धावा केल्या. एकीकडे विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला विराट कोहली खंबीरपणे फलंदाजी करत राहिला.
विराट कोहलीने रजत पाटीदारच्या साथीने आरसीबीच्या डावाला आकार दिला. दोघांनी ३२ चेंडूमध्ये ७६ धावांची झंझावती भागिदारी केली. पाटीदार बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याच्यासोबत ४६ चेंडूमध्ये ९२ धावांची भागिदारी केली. विराट कोहलीच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने मोठी धावसंख्या उभारली. रजत पाटीदार याने आरसीबीच्या धावसंख्येला वेग दिला. पाटीदार याने फक्त २३ चेंडूमध्ये ५५ धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये रजत पाटीदारने सहा षटकार ठोकले, तर तीन चौकार लगावले. रजत पाटीदारने २४० च्या रनरेटने धावांचा पाऊस पाडला.
विराट कोहलीचे शतक हुकले
रजत पाटीदार बाद झाल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा संभाळला. कॅमरुन ग्रीनसोबत कोहलीने डावाला आकार दिला. विराट कोहलीने वादळी ९२ धावांची खेळी केली. त्याचे शतक फक्त ८ धावांनी हुकले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने १९६ च्या स्ट्राईक रेटने ४७ चेंडूमध्ये ९२ धावांची खेळी केली. रनमशीन विराट कोहलीने सहा षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला.
दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. कार्तिकने सात चेंडूमध्ये दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने १८ धावांचे योगदान दिले. लोमरोर याला फटकेबाजी करता आली नाही. त्याला खातेही उघडता आले नाही. स्वप्निल सिंह एका धावेवर नाबाद राहिलाय. कॅमरुन ग्रीनने २७ चेंडूमध्ये ४६ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एक षटकार आणि पाच चौकार ठोकले.हर्षल पटेल याने अखेरच्या षटकात भेदक मारा केला. हर्षल पटेलने अखेरच्या षटकात तीन धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. विद्वात कवेरप्पा याने पदार्पणात भेदक मारा केला. कवेरप्पा याने पॉवरप्लेमध्येच दोन विकेट घेतल्या. त्याने चार षटकात ३६ धावा खर्च करत डु प्लेलिस आणि विल जॅक्स यांना बाद केले. अर्शदीप सिंह याने ३ षटकात ४१ धावा खर्च करत एक विकेट घेतली, तर सॅम करन याने तीन षटकात ५० धावा खर्च करत एक विकेट घेतली. लियाम लिव्हिंगस्टोन याने ३ षटकात २८ धावा खर्च केल्या. राहुल चाहर याने तीन षटकात ४७ धावा खर्च केल्या.
कोहलीचे विक्रम
हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर विराट कोहलीचे ९ वे शतक हुकले. असे असूनही त्याने एक विशेष कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये ३ संघांविरुद्ध १०० हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने पंजाब किंग्जशिवाय दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या विरुद्ध १००० धावा केल्या आहेत. कोहलीशिवाय पंजाब किंग्जविरुद्ध १००० हून अधिक धावा करण्याचा विक्रम इतर ३ फलंदाजांच्या नावावर आहे. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माशिवाय ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि भारतीय संघाबाहेर असलेला शिखर धवन यांच्या नावांचा समावेश आहे.
कोहली आयपीएल हंगामात ६०० किंवा ६०० पेक्षा जास्त धावा करणारा संयुक्तपणे पहिला फलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या एका मोसमात कोहलीने ६०० हून अधिक धावा करण्याची ही चौथी वेळ आहे. विराट कोहलीने २०१३ मध्ये पहिल्यांदा ६०० धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर २०१६, २०२३ आणि आता २०२४ मध्येही त्याने ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीशिवाय केएल राहुलच्या नावावरही चार वेळा आयपीएलमध्ये ६०० हून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. राहुलने २०१८ मध्ये पहिल्यांदा ६०० धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर, त्याने २०२०, २०२१ आणि २०२२ मध्येही चांगली फलंदाजी केली आणि ६०० हून अधिक धावा केल्या.

आरसीबीसाठी भारतीय फलंदाजांच्या सर्वाधिक धावा
७८९७ विराट कोहली
९००* दिनेश कार्तिक
८९८ राहुल द्रविड
८८४ देवदत्त पडिक्कल
७२१ पार्थिव पटेल

कोहलीची विराट खेळी
आयपीएल २०२४ मध्ये ६००+ धावा करणारा पहिला खेळाडू
आयपीएलमध्ये ४ वेळा ६००+ धावा
आयपीएल हंगामात सर्वाधिक ६००+ संयुक्त
३ संघांविरुद्ध १०००+ धावा.
२०२४ आयपीएलमध्ये ३० षटकार
टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार पूर्ण