बार्देशमधील लईराई देवीचे धोंड व्रतासाठी एकत्र

उसकई येथील श्री जागबाई देवस्थानच्या प्रांगणात जमले धोंड

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 12:45 am
बार्देशमधील लईराई देवीचे धोंड व्रतासाठी एकत्र

म्हापसा : शिरगाव - डिचोली येथील श्री लईराई देवीची जत्रा रविवार, दि. १२ मे रोजी साजरी होणार आहे. यानिमित्त बार्देश तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील धोंडांनी गावातील मंडपांमध्ये एकत्रित होऊन व्रत करण्यास प्रारंभ केला आहे.

उसकई येथील श्री जागबाई देवस्थानच्या प्रांगणातील अगरशाळेच्या मंडपात उसकईसह, बस्तोडा व नास्नोळातील धोंड एकत्र आले आहेत. गेली वीस वर्षे या ठिकाणी हे धोंड व्रत करतात. यामध्ये महेश मयेकर, राजेश मयेकर, नीलेश मयेकर, रूपेश मयेकर, संदेश मयेकर, रत्नदीप मयेकर, संतोष मयेकर, प्रितेश मयेकर, संदीप पोळजी, गुरूदास कांदोळकर, शेखर मांद्रेकर, महाबळेश्वर कवळेकर, आनंद गडेकर या धोंडांचा समावेश आहे.

श्री देवीचे भक्त महेश मयेकर हे गेली ४२ वर्षे धोंड म्हणून व्रत करीत आहेत. त्यानंतर त्यांचा भाऊ राजेश मयेकर यांचा क्रमांक लागतो. मयेकर कुटंबियांची सध्या तिसरी पिढी धोंड व्रत करीत आहे.

गुढी पाडव्यापासून जत्रेपर्यंत म्हणजेच महिनाभर शाकाहार पाळला जातो. वर्ष पद्धतीप्रमाणे जत्रेच्या अगोदर पाच दिवस आम्ही या मंडपात व्रत करण्यासाठी एकत्र जमतो, अशी माहिती महेश मयेकर यांनी दिली.

व्रत दरम्यान जेवण खाण्यासाठी येणार खर्च आम्ही सर्वजण विभागून घेतो. तसेच काही भाविक आम्हाला जेवणाच्या साहित्यात मदत करतात. स्वयंपाक बनवण्याचा भार महिला कुटुंब सदस्य सांभाळतात. त्यामुळे हे व्रत करताना आम्हाला कोणतीही अडचण होत नाही, असे व्रतस्थ धोंड राजेश मयेकर यांनी सांगितले.