अमेरिकेचा सल्ला धुडकावत इस्रायलचा राफावर जबर हल्ला; महिला, लहान मुलांसह १२ ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 03:02 pm
अमेरिकेचा सल्ला धुडकावत इस्रायलचा राफावर जबर हल्ला; महिला, लहान मुलांसह १२ ठार

कैरो/राफा : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची विनंती धुडकावत इस्रायली सैन्याने गाझाच्या दक्षिणेकडील शहर राफावर जोरदार हवाई हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत महिला आणि लहान मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायल आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

हल्ल्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना बायडेन यांनी संपर्क केला होता. राफावर हल्ला झाल्यास अमेरिकेकडून होणारा शस्त्रांचा पुरवठा बंद केला जाईल तसेच आधीच दिलेली शस्त्रे परत घेतली जाईल, अशी धमकी बायडेन यांनी दिली होती. मात्र, या धमकीला नेतन्याहू यांनी भीक घातली नाही. आमच्या सैन्याकडे हमासशी लढण्यासाठी पुरेशी शस्त्रे आहेत. हमाससाठी एकटा इस्रायल पुरेसा आहे, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. आता इस्रायलने राफा आणि गाझा पट्टीच्या इतर भागांमध्ये हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे. तसेच कोणत्याही स्थितीत युद्ध थांबणार नाही, अशी घोषणा केली आहे.

दरम्यान, अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या बॉम्बमुळे गाझामध्ये निष्पाप पॅलेस्टिनी मारले गेल्याची कबुली ज्यो बायडेन यांनी दिली आहे. गाझामध्ये नागरिकांचा बळी घेणारे घातक बॉम्ब इस्रायलला अमेरिकेकडून मिळाले होते. त्यामुळे या बळींना अमेरिकाही कारणीभूत आहे. याची खंत वाटते, असे बायडेन यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा