हवामान बदलामुळे गोव्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम; काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले

कृषी संचालकांनी केले स्पष्ट; पारंपरिक शेतीतून बाहेर येण्याचा दिला सल्ला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 04:37 pm
हवामान बदलामुळे गोव्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम; काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले

पणजी : हवामानात होत असलेल्या विचित्र बदलाचा फटका यंदा गोव्यातील काजू पिकाला बसला आहे. अवकाळी पावसाने काजूचा हंगाम पुढे ढकलला असून उत्पादनात घट झाली आहे, असे कृषी संचालक नेव्हिल अफोन्सो यांनी म्हटले आहे.

‘गोवा वन विकास महामंडळा’तर्फे आजपासून तीन दिवसांच्या ‘काजू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी कला अकादमीमध्ये काजू लागवडीबाबत तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात अफोन्सो बोलत होते.

नोव्हेंबरमध्येही ४-५ दिवसांच्या अवकाळी पावसाचा पहिला फटका बसला. चांगल्या काजू पिकासाठी उष्ण वातावरण आवश्यक असते, असे नाही. गोव्यात डिसेंबरपर्यंत हिवाळा असतो. परंतु यावेळी जानेवारीच्या उत्तरार्धात हिवाळा होता. हवामान बदलाच्या या दोन घटनांमुळे काजू उत्पादनात विलंब झाला. तसेच उत्पादनही कमी झाले. या कालावधीत काजू उत्पादनात सुमारे ५० टक्के घट झाल्याचे अफोन्सो यांनी सांगितले. काजू महोत्सवाच्या निमित्ताने उत्पादन कसे वाढवायचे, आपल्यासमोर कोणते अडथळे येत आहेत. हवामानात बदल होत असल्याने ते कसे दूर करायचे, यावर चर्चा करण्यासाठी तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जुन्या तंत्रज्ञानाचे संशोधन कसे करायचे आणि नवीन तंत्रज्ञान कसे विकसित करायचे यावर आमचा भर असेल. गोव्यात काजू हे मुख्य पीक आहे. त्यानंतर नारळ आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था काजू पिकांवर अवलंबून आहे. काजूवर परिणाम झाला तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. सध्या शेतकरी पारंपरिक पद्धतीने काजू काढत आहेत. जेव्हा काजू पिकतात तेव्हा आपण काजूकडे जातो. ही नैसर्गिक पद्धत आपण वापरतो. परंतु जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल तर आपल्याला नैसर्गिक पद्धतींसह खते आणि कीटकनाशके वापरण्याची गरज आहे, असे अफोन्सो यांनी म्हटले आहे.