अन्य राज्यांतील बेरोजगारांना आमिष दाखवून मानवी तस्करीसाठी आणले जाते गोव्यात : डीजीपी

मानवी तस्करी बाबतच्या कार्यशाळेत डीजीपी जसपाल सिंग यांचे मार्गदर्शन; पालकांना दिला ‘हा’ सल्ला

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
10th May, 02:22 pm
अन्य राज्यांतील बेरोजगारांना आमिष दाखवून मानवी तस्करीसाठी आणले जाते गोव्यात : डीजीपी

पणजी : गोवा हे पर्यटन राज्य आहे. त्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या लोकांना हे एक रेडिमेड मार्केट असल्याचे वाटते. येथे येणाऱ्या पर्यटकांना अशा प्रकारची प्रलोभने देता येतील, असेही त्यांना वाटत असते. अन्य राज्यांतील बेरोजगार, गरीब, गरजूंना येथे हॉटेलमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोव्यात आणले जाते आणि मानवी तस्करी केली जाते, अशी माहिती पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिली.

गोवा पोलीस खात्यातर्फे आज येथे झालेल्या मानवी तस्करी बाबतच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, पोलीस अधीक्षक एझिल्डा डिसोझा, सामाजिक कार्यकर्ते राजेश मणी, एकांशी गांगुली उपस्थित होते.

गोव्यात पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक व्यवसाय आहेत. अशावेळी येथील हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी देतो, असे सांगून गरजू व्यक्तींना गोव्यात आणणे सोपे जाते. मात्र, नंतर त्यांची मानवी तस्करी केल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा जाहिरातींवर पोलीस खात्यातील आर्थिक गुन्हे विभाग लक्ष ठेवून असतो. जाहिरात देणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक ती कागदपत्रे आहेत का? रोजगारासाठी आलेल्या लोकांची मानवी तस्करी होणार नाही ना, याची माहिती आम्ही घेतो, असे सिंग यांनी सांगितले.

मानवी तस्करी हा केवळ गुन्हा नसून आपल्या समाजात खोलवर रुजेलेली एक समस्या आहे. अशा गुन्ह्यात पीडित व्यक्तीचे पुनर्वसन करणे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्या व्यक्तीला अशा प्रकरणातून बाहेर काढल्यावर त्यांना कोणता रोजगार देणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. अशा व्यक्ती शक्यतो गरीब घरातील असतात. त्यामुळे त्यांना अन्य नोकरी किंवा रोजगार मिळणे आवश्यक असते. यासाठी केंद्र तसेच राज्यात वेगवेगळ्या योजना आहेत. त्यांचा लाभ घेऊन त्या व्यक्तीला आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर लक्ष ठेवावे

सध्या विविध प्रकारांनी मानवी तस्करी केली जात आहे. इंटरनेट किंवा अन्य ऑनलाईन माध्यमातून युवा वर्गाला आकर्षित केले जाते. त्यांना नोकरी किंवा अन्य आमिषे दाखवून फसवले जाते. त्यामुळे पालकांनी देखील आपली मुले मोबाईलवर कुणाशी आणि किती वेळ बोलत आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांचा स्क्रीन टाईम वाढला असेल तर पालकांनी त्यांना याबाबत विचारून तो काही चुकीचे करत नाही, याची खात्री केली पाहिजे, असा सल्ला पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिला आहे.